
हात तुझा हातातुन धुंद ही हवा
रोजचाच चंद्र आज भासतो नवा
रोजचेच हे वारे, रोजचेच तारे
भासते परी नवीन विश्व आज सारे
ही किमया स्पर्शाची भारिते जिवा
या हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया
मोहरले हृदय तसे मोहरली काया
चांदण्यात थरथरतो मधुर गारवा
जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो
स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो
बिलगताच जाईचा उमलतो थवा
क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज रक्तातुन वाहे
आज फुले प्राणातुन केशरी दिवा
-- मंगेश पाडगावकर
No comments:
Post a Comment